Friday, October 12, 2012

इंग्लिश-विन्ग्लीश .. विचार-बिचार

 
आज मी श्रीदेवीचा बहुचर्चित सिनेमा "इंग्लिश-विन्ग्लीश" बघितला. 

आवडला मला.

एकूण सिनेमा मध्ये प्रतिकूल परिस्थिती मधून वाट काढणं , जिद्दीने काही नवा शिकणं , असे चांगले संदेश आहेत. आणि ह्या चित्रपटाने बर्याच अंशी , अनेक गृहिणींच्या वेदना जगासमोर आणल्या आहेत असं मनापासून वाटलं . खासकरुन माझ्या आई, काकू, मावशीच्या पिढीतल्या स्त्रियांच्या.

हिंदी  सिनेमा म्हटल्यावर  त्यात थोडी अतिशयोक्ती असणार हे जरी गृहीत धरलं , (आणि तशी थोडी आहे इथे सुद्धा..ती सोडून देऊ.) 
 
तरीही त्यातले काही सीन्स विचाराची चक्र चालू करून गेले ..मोठं  होताना  पाहिलेल्या , कानावर पडलेल्या गोष्टी आठवत गेल्या.

बरेचसे संवाद , पती-पत्नी मधले , अगदी सहज जाता जाता ऐकलेले लहानपणी . मोठं होताना, आपल्या आजूबाजूच्या, वेगवेगळ्या समाज स्तरातल्या स्त्रियांना, असे दर दिवशी , हर घडी, अनेक अपमान पचवताना, गिळताना पाहिलेलं ..ते सगळं ढवळून वरती आलं मनात.

आज परिस्थिती बदलली आहे हे खरंय, कारण बहुतेक स्त्रिया आता आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, कमावत्या आहेत. आणि मुलामुलींचं नातं सुद्धा मैत्रीपूर्ण , healthy होऊ पाहत आहे.

पण मी विचार करतेय आमच्या आई -मावशीच्या पिढीचा. त्या स्त्रियांनी कशी कुटुंब सावरली त्याचा. आणि त्यांच्या वाट्याला त्या बदली काय काय आलं , त्याचा ही ..

.......

घरात चार पाच माणसं , लहान-थोर, सगळ्या वयाची . प्रत्येकाच्या वेगळ्या तऱ्हा, वेगळ्या गरजा. शारीरिक , आणि मानसिक, भावनिक ही .

एक गृहिणी - वेगवेगळ्या वयाच्या , घराल्या सगळ्या माणसांना अखंड झेलणारी , त्यांचं हवं -नको  बघणारी , त्यांचे राग, चिडचिड,
दुः खं, सारं आपलं मानून त्यांना समजून घेणारी ..

किती ओढाताण होत असेल तिची सगळ्यांना सांभाळताना !

कुठून आणली असेल तिने ही सहनशक्ती ? कुठून हे कौशल्य मिळवलं  असेल, कुणाचा तरी जहरी टोमणा पचवून, हसतमुखाने सर्वांसमोर वावरण्याचं ? इतक्या वेदना कशा सहन केल्या असतील आयुष्यभर ? 

.......

किती गृहीत धरायचो ना आपण तिला !

मुलांची शाळेची  वेळ, नवरयाच ऑफीस , मोठ्या  लोकांच्या औषधाच्या वेळा , असं सगळं डोक्यात ठेवून त्यांना वेळेवर डबे, जेवण देणारी ती ..स्वतः किती वेळा वेळेत जेवली असेल?

कधी  नवरा रागात काही बोलतो, नेमका त्याच दिवशी मुलांचा सुद्धा मूड बिनसतो , ती रुसतात, चिडतात..त्यात स्वत:ला बरं वाटत नसतं...असं सगळं जेव्हा एकाच वेळी तिच्यावर अनेकदा येऊन पडलं  असेल,

'Taken for granted, Insulted, discouraged', अशा सगळ्या नकारात्मक गोष्टी जेव्हा सतत तिच्या वाट्याला आल्या असतील,

तेव्हा कुठल्या आंतरिक शक्तीने तिने स्वत:ला सावरलं असेल ? 

घरातल्या सगळ्यांचा हक्काचा लेट आउट असणाऱ्या तिला, कधी हवा तेव्हा लेट आउट मिळाला असेल का? कधी तिच्या मनाचा, तिच्यावर पडणाऱ्या भावनिक ताणाचा विचार झाला असेल का?

सतत घरातल्या इतरांचे शेड्युल सांभाळण्या साठी पळणाऱ्या तिला कधी स्वत:चं , स्वत:साठीचं शेड्युल सांभाळता आलं असेल का ?

तिच्या आजारपणात कोणी तिच्या अंथरुणा पाशी रात्रभर जागलं  असेल का तिच्या सारखं ? किती एकटं वाटलं असेल तिला अश्या वेळी!

आता मागे पाहताना वाटतं , तिचं हे झिजणं , हे योगदान आम्ही अगदीच दुर्लक्षित करत आलो. मग तिचा आत्मसन्मान जपणं तर दूरच राहिलं ! 

खरं  तर तिच्या भरवश्यावरच जगत आली अनेक कुटुंबं . तिचं तिच्या कुटुंबावरचं प्रेम हे खऱ्या अर्थाने "Unconditional" होतं . 
 
आज आम्हा अनेक मुलांना आईचे, मावशी-काकू चे ते कष्ट आठवतात , त्यांचा मोल समजतं , आम्ही मोकळेपणी ते मान्यही करतो. त्यांना आतातरी सुखात ठेवावं , म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतो .

पण त्यांच्या आयुष्यातला प्राईम टाईम गेलाच ना ! ...आणि तो वेदनादायी गेला ..ह्याची चुटपूट कुठेतरी मनाला लागून राहते .


'इंग्लिश-विन्ग्लीश' सारखा सिनेमा कितीजणावर, कितपत परिणाम करतो , मला ठावूक नाही , पण तो नक्कीच ह्या गृहिणींच्या दु:खाला वाचा फोडतो..लोकांसमोर आणतो.बाकी कोणी नाही तरी तमाम गृहिणीनी दिग्दर्शक गौरी शिंदे ला अनेक धन्यवाद दिले असतील, हा विषय मोठ्या पडद्यावर आणल्याबद्दल. 

आपल्या दुःखाची आपल्या घरात नाही, तरी कुठेतरी, कोणीतरी दाखल घेतली , ही सुधा एक सुखावून जाणारी बाब असते !

चित्रपट पाहिलेल्यांपैकी निदान थोड्यांना तरी तो अंतर्मुख करू शकेल..त्यांच्या घरातल्या गृहिणींना त्यांचा आत्मसन्मान मिळेल,अशी अशा करायला काय हरकत आहे, नाही का !

शेवटी या चित्रपटातला मला अगदी सगळ्यात आवडलेला विचार - 

"जब  अपने आप को पसंद नही  करते  हो ना, तो अपने से जुडी हुई हर चीज बुरी  लगने लगती  है ..नयी चीजे आकर्षित करती है.. जब हम अपने आप को प्यार करने लगते  है , तो वही  पुरानी  जिंदगी अच्छी  लगने  लगती  है !"

 Love yourself ! Feel good about yourself! That's the key to be able to love the world around! :-)
 


No comments:

Post a Comment